Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on pinterest

Bindu Chowk

कोल्हापुरातील ऐतिहासिक घटनांचे केंद्र, बिंदू चौक

रविवार वेशीच्या तटाजवळ मोठे पिंपळाचे झाड होते. त्याला बांधिव पार होता. पारा जवळच एक फार वापरात नसलेली धर्मशाळा होती.

या परिसराला रविवारातला पार असेही म्हटले जायचे. नगरपालिकेने पार व धर्मशाळा पाडली. जागा ऐसपैस केली. या जागेवर आठवड्याचा बाजार भरू लागला.

त्यात मिरची घोंगडी याचाच व्यापार अधिक होता. बकऱ्याचा बाजारही काही काळ तेथे भरला. त्यानंतर तिथे खाजगी प्रवासी वाहतुकीचे स्टॅन्ड सुरू झाले.

एक पेट्रोल पंप सुरू झाला. या परिसराची ओळख आदित वारे वेस रविवार वेस अशी झाली.

Bindu-chowk

रविवार वेशी

या रविवार वेशीतून खाली आईसाहेब महाराजांच्या पुतळ्याकडे जायला १९३५ पर्यंत रस्ता नव्हता. शिवाजी पुतळा ते रविवार वेस या रस्त्याला विल्सन रोड असच नाव होतं . जे . पी . नाईकांनी रविवार वेशीतून खाली उत्तरेला नवीन रस्ता काढला.

तो सायन्स कॉलेज शाहू टॉकीजजवळ जाऊन मिळाला. रविवार वेशीत समोर उतरणीला बागवान , ढोर व भोई गल्ली. कातडे कमवायचा उद्योग पूर्वी ढोर गल्लीतच चालायचा.

बागवान गल्लीच्या कोपऱ्याला नळवाले बागवान यांचे घर होते. त्यांच्या घरासमोर तीन गाईंचं तोंड असलेला एक लोखंडी पाण्याचा नळ होता. त्यामुळे त्यांची ओळख नळवाळे बागवान अशी पडली.

त्यांच्याच इमारतीत शामराव राणे यांचं मनमोहन हॉटेल होते. वरच्या मजल्यावर डॉक्टर टेंबे यांचा दवाखाना होता. ज्येष्ठ हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांच्या मुलाचा हा दवाखाना होता.

रविवार पाराच्या परिसरात म्युनिसीपालटीची एक शाळा होती. समोर भुसारी वाडा होता . या वाड्यात सिटी हायस्कूल होते जवळच जुना तुरुंग होता ( आताचेखादी ग्रामोद्योग भांडार ).

दोन नंबर शाळेला रंगराव साळुखे विद्यालय असं नाव देण्यात आले. याच परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही जी चव्हाण व ज्येष्ठ कामगार नेते यशवंत चव्हाण यांची घरे होती.

बिंदू चौक

‘ भारत छोडो ‘ चळवळीची हाक महात्मा गांधींनी १९४२ मध्ये दिली . देशभर ब्रिटिश राजवटीविरुद्धचा असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून प्रकट होऊ लागला. कोल्हापूर शहरात पूर्वीपासूनच स्वातंत्र्य चळवळीला पूरक काही उघड तर काही भूमिगत हालचाली होत्या.

१५ ऑगस्ट १९४२ नागपंचमीचा दिवस. त्या दिवशी खास बागेत विद्यार्थ्यांनी सभा आयोजित केली होती . ज्येष्ठ नेते यशवंत चव्हाण यांचे भाषण झाले.

घोडेस्वार पोलिसांचे पथक सभेच्या बंदोबस्तासाठी होते. सादरीने सभा थांबून विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाण्याचा आदेश दिला. पण हा आदेश कोणी मानला नाही.

खासबागेच्या परिसरात यावेळी प्रा . ना . सी . फडके राहत होते. सभा पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला त्याला विद्यार्थ्यांनी प्रतिकार केला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.

पोलिसांनी लाठीमारास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनीही दगडफेक सुरू केली. मोठी पळापळ झाली . जवळ बागवान गल्लीच्या कोपऱ्याच्या पुढे लाठीमारात एका शाळकरी विद्यार्थ्याचे डोके फुटले .

अब्बास दादाभाई बागवान यांच्या घरासमोर हा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. त्या शाळकरी विद्यार्थ्याला सरकारी इस्पितळात नेले.

पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्टला त्यांची अंत्ययात्रा काढली. सारे शहर रस्त्यावर आले. अंत्ययात्रा रविवार वेशीत आली आणि कोणीतरी रविवार वेशीच्या बुरुजावर फलक लावला बिंदू नारायण चौक ‘ आणि त्याच दिवसापासून रविवारवेशीचे नाव बिंदू चौक असे झाले.

पण अखेरपर्यंत या बिंदू नारायण कुलकर्णीचे छायाचित्र कोणासही उपलब्ध झाले नाही. यानंतर बिंदू चौकाचा सार्वजनिक सभेसाठी वापर सुरू झाला.

९ डिसेंबर १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा या चौकात बसवला. करवीर जनतेच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले. भाई माधवराव बागल पुतळा समितीचे अध्यक्ष होते.

त्यानंतर १७ ऑक्टोबर १९६० रोजी चौकात हतात्मा स्तंभ उभारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या हुतात्मा स्तंभाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पा . पी . पवार नगराध्यक्ष होते.

या स्तंभावर करवीर सिद्धया स्वामी, शंकरराव इंगळे, नारायण दाजी वारके, हरिबा बेनाडे, तुकाराम रामजी भारमल, मल्लाप्पा चौगुले, परशुराम कृष्णा साळुखे, नरसु परीट, महादेव सुतार, अण्णा रामगोंडा पाटील, निवृत्ती गोपाळ अडूरकर, शंकर गोपाळ पोतदार, बळवंत जबडे, गुंडा धुळा सुतार, मारुती कृष्णा आगलावे, कल्लाप्पा पुतळ, गणपती हरी मोरे, गोपाळ बळवंत फराकटे, बिंदू नारायण कुलकर्णी, गोपाळ कृष्ण तेली उर्फ क्षीरसागर अशी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांची नावे आहेत . . .

काही दिवसापासून बिंदू चौकातल्या राजकीय सभांना बंदी आहे पण कोल्हापूरचा मध्यवर्ती चौक म्हणून बिंदू चौक अशी त्याची ओळख आजही कायम आहे.

Direction

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top